Blog

चित्रसंदेश: व्हॅल्किरी

महत्त्वाकांक्षी व्यक्तींचे अनेक शत्रू असतात. त्यातल्या त्यात महत्त्वाकांक्षा जर अघोरी बनू लागली तर ते शत्रुत्व अधिक प्रबळ होत जाऊन त्याचे रुपांतर एखाद्या कटात होते. त्या कटाला काही वैचारिक बैठक असेल तर कट यशस्वी होऊन अवाजवी महत्त्वाकांक्षेचा नायनाट होऊ शकतो. पण त्यासाठी निर्णयक्षम व्यक्तींची गरज असते. व्हॅल्किरी कट हा असाच काहीशी वैचारिक बैठक लाभलेला कट. किमान काही लोक नंतर सामील झाले त्यांना एक वैचारिक बैठक होती. याच पैलूवर प्रकाश टाकणारा चित्रपट “व्हॅल्किरी”. हिटलरवर झालेल्या आणि फसलेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांपैकीच एक.

चित्रपटाची सुरुवात होते ती जर्मन सैन्याच्या प्रतिज्ञेच्या आवाजाने. त्या सैन्याच्या प्रतिज्ञेत सामान्यतः असलेल्या राष्ट्रसंरक्षणाच्या शब्दांऐवजी हिटलरशी (फ्युरर) एकनिष्ठ राहण्याची आणि त्याच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राण देण्याचीच भाषा. बाकी सगळे राष्ट्रप्रेम वगैरे दुय्यम. उत्तर आफ्रिकेच्या वाळवंटात सैन्य अतिशय बिकट स्थितीत असताना आणि पराभवाच्या मार्गावर असतानाही ती लढाई सुरुच ठेवण्याचा वरिष्ठांचा (पर्यायाने फ्युररचा) आदेश पाहून कर्नल स्टाफेनबर्गच्या मनाची घालमेल होत राहते. डायरीत तो गेस्टापो आणि एसएसच्या क्रूरता आणि छळछावण्यांसंदर्भात नोंदी करत असतो. फ्युररने घडवून आणलेल्या ज्यूंच्या नरसंहारामुळे तो आपली जर्मनीमध्ये शांती आणि समृद्धीची वचने विसरला आहे याची स्टाफेनबर्गला खात्री पटते. शिवाय त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वर्तुळात राष्ट्राची आणि पर्यायाने जर्मन सैन्याची (ज्याचा आपण एक भाग आहोत) प्रतिमा डागाळली जात आहे. संपूर्ण मानवजातीलाच हिटलर हा शाप आहे असे विचार घेऊनच स्टाफेनबर्ग प्रतिज्ञा करतो की आजपासून हिटलरच्या प्रतिज्ञेला विसरुन हिटलरच्या पंजातून जर्मनीला सोडवणे हेच ध्येय माझे अंतिम ध्येय आहे. त्याच दिवशी सैन्यतळावर विमानांचा हल्ला होऊन स्टाफेनबर्ग आपला एक पंजा, दुसर्‍या हाताची बोटे आणि एक डोळा गमावतो.

हुकुमशहा असलेल्या हिटलरला त्याच्या नेतृत्वगुणांमुळे जसे राष्ट्रप्रमुखपद मिळाले तसेच स्वतःच्या एकांगी आणि मिजासखोर वागण्याने त्याने काही हितशत्रूही तयार झाले. त्यांतलेच काही त्याची बर्लिनमधली सत्ता उलथून टाकण्यासाठी त्याला ठार मारण्याचा कट करतात. परंतु त्यात राष्ट्रभावनेहून अधिक सत्तेच्या ईर्षेचा भाग अधिक असतो. यामध्ये ऑस्टर, बेक, ऑल्ब्रिच, आणि काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा सहभाग असलेली टोळी तयार होते. याआधी फ्युररच्या विमानात बॉंब ठेवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न फसलेला असतो. स्टाफेनबर्गला ते त्यांच्यात सामील करुन घेतात. अधिकाधिक विश्वासू सदस्य सामील करुन घेण्याच्या प्रयत्नांत ते काही बांधावरल्या (फिफ्टी-फिफ्टी) मनस्थिती असलेल्या अधिकार्‍यांनाही आपल्या योजना कळवतात. अर्थात हा चित्रपट इथेच एक धडा देऊन जातो की, जोखमीच्या परिस्थितीत साथीदार निवडताना पुरेशी काळजी घेतलीच पाहिजे.

पुढे स्टाफेनबर्गच्या मनातली आंदोलने, त्याचे प्रयत्न अतिशय समर्पकतेने समोर आले आहेत. हॉस्पिटलमधून पहिल्यांदाच घरी आल्यावर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाच विमानहल्ल्याचा सायरन वाजून बॉंबहल्ला सुरु होतो. त्यावेळी स्टाफेनबर्गला स्वतःच्याच तळघरातील बंकरचा आसरा घ्यावा लागतो. देशाच्या राजधानीत सामान्य लोकांनाही अशा बंकर्सची गरज असणे हे हिटलरच्याच राजवटीचे अजून एक विखारी फळ. त्यावेळी घरावरच आघात होऊन ते उद्ध्वस्त होते आणि स्फोटांच्या आवाजागणिक स्टाफेनबर्गच्या मनावर एकेक आघात अधिक ठळकपणे होत राहतात. त्यावेळी त्याच्या मनातली आंदोलने, आणि त्याच्या निश्चय अधिक दृढ होण्याचे दृश्य हे टॉम क्रुझच वठवू जाणे. अशाच असुरक्षित वातावरणामुळे कुटुंबवत्सल स्टाफेनबर्ग आपल्या कुटुंबाची दुसर्‍या शहरात पाठवणी करतो, त्यावेळी त्यातला सैनिकी पोषाखाच्या आतमध्ये असलेला प्रेमळ पिता आणि पतीही टॉमने दाखवून दिला आहे. एकदा अशाच बांधावरल्या अधिकार्‍यासमोर आपली योजना उघड केल्यावर जेव्हा तो सामील होण्यास नकार देतो तेव्हा स्टाफेनबर्ग हिटलरचा जयघोष करणारी घोषणा करण्यास टाळाटाळ करतो. त्या अधिकार्‍याने insist करताच तो ज्या तगमगतेने आपल्या थोटक्या हाताने ती घोषणा करतो त्यावेळचा प्रसंग अधिक परिणामकारकरीत्या सामोरा येतो. जणू त्याच्या फ्युररवरच्या नसलेल्या निष्ठेचे प्रतीकच त्याच्या नसलेल्या पंजातून दिसले.

खरं तर ‘व्हॅल्किरी’ हे हिटलरच्या पश्चात करावायाच्या सैन्य कारवाईची एक मार्गदर्शिका, अर्थातच हिटलरच्या ध्येयधोरणांशी सुसंगत. पण स्टाफेनबर्ग अगदी शिताफीने त्यात बदल करुन त्यावर हिटलरची सहीही मिळवतो. पुढे हिटलरच्या गोटात (wolf’s lair) स्फोट घडवल्यानंतर स्टाफेनबर्ग आणि त्याचा ऑर्डर्ली ज्या आत्मविश्वासाने तिथून निसटतात आणि फोनवर नसलेला पलीकडला अधिकारी ज्या पद्धतीने गेटमनला असल्याचे भासवून गेट उघडण्यास राजी करतो तो आत्मविश्वासही आजच्या कॉर्पोरेट जगताने आत्मसात करावा असाच आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्यात धडाडीने निर्णय घेण्याचा अभाव असूनही कर्नल स्टाफेनबर्ग कट यशस्वी करण्यात जवळपास यशस्वी होतो. परंतु पुढे प्रभावी संपर्कयंत्रणेच्या अभावामुळे आणि संदेश देवाणघेवाण अधिक स्पष्टतेने न झाल्याने हा कट उधळला जातो. प्रभावी  संपर्कयंत्रणेची आत्यंतिक गरज आजही तितकीच कालातीत, अगदी कुठल्याही क्षेत्रात. कालांतराने कट उघड होऊन त्यात सामील होणार्‍या अधिकार्‍यांना देहदंडाची शिक्षा होते. आणि तेव्हाही स्टाफेनबर्गचे अखेरचे शब्द त्याची प्रखर राष्ट्रभक्तीच दर्शवतात. “Long live sacred Germany!”.


2 Responses to “चित्रसंदेश: व्हॅल्किरी”

  1. दिपक says:

    चित्रपट समिक्षा – चांगली आहे. विकेन्डचा प्लान झालाच समजा.
    हिटलर – त्याचे मनसुबे आणि हत्त्या/ हमला यावरचाच "इनग्लोरिअस बास्टर्ड्स" नावाचा एक चांगला सिनेमा आहे. बघ जमला तर – आवडेलच!

  2. Pranav says:

    If you get a copy, do see Shawshank Redemption and Schindlers List. Two of my all time favorites. Hope you will like them too. :)

Leave a Reply

 

Recent Photo Galleries

Jatra-2013
Beautiful Baglan
Bull racing
Jagran-Gondhal

Latest Blog Posts

Inspirations !