शिवाजी महाराज आणि सुभाषबाबू: एक तुलनात्मक साम्य
शून्यातून पराक्रमाचा महामेरू उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस ही माझी आवडती व्यक्तिमत्त्वे. त्यातले महाराज “श्रीमानयोगी” आणि “राजा शिवछत्रपती” यांतून भेटले. संभाजी महाराज “छावा”त, सुभाषबाबू “महानायक”मध्ये. सध्या “महानायक” दुसऱ्यांदा वाचायला घेतलंय. या वेळी एक विशेष अभ्यासपूर्वक वाचन करून नंतर एक पोस्ट लिहिण्याचा विचार आहे.
या पराक्रमी महापुरुषांवर स्वराज्याचे संस्कार अगदी लहानपणापासूनच रुजले होते. शिवराय आणि शंभू महाराजांवर त्यांच्या माता-पित्यांचे आणि सुभाषबाबूंना स्वामी विवेकानंद, राशबिहारी बोस या त्यांच्या गुरुंमार्फत संस्कार मिळत गेले. याच संस्काराच्या मुशीतून घडलेली विचारांची पक्की बैठक आणि झपाटलेपण असल्याशिवाय असे महत्पराक्रम हातून घडणे केवळ अशक्यच. जीवाला जीव देणारी अचूक माणसे हेरणे त्यांच्यावर आपला अमाप प्रभाव पाडणे आणि त्यांच्या संघटनेत चपखल उपयोग करून घेणे हे फक्त त्यांनाच जमले. म्हणूनच तर शिवरायांना सह्याद्रीत हिरोजी, कान्होजी, फिरंगोजी, तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी, प्रतापराव असे नररत्ने गवसली आणि सुभाषबाबूंना जपानच्या युद्धकैद्यांमध्ये शाहनवाझ, सेहगल, मोहनसिंग, लक्ष्मी असे हिरे गवसले.
रणांगणावर कणखर योद्ध्याची भूमिका वठवणाऱ्या या दोन्ही वीरांच्या आयुष्यात हळुवार मंद झुळूकीसारख्या, फुरफुरणाऱ्या ज्योतीला वावटळीत हळुवार हातांचा आडोसा देणाऱ्या अर्धांगिनी लाभल्या. आणि त्याच अर्धांगिनींचा विरह सहन करावा लागला. शिवरायांना अकाली निघून गेलेल्या सईबाईची सय कायम येत राहिली आणि सुभाषबाबूंना दूरदेशी असलेल्या एमिलीची.
शिवराय आणि सुभाषबाबू या दोघांच्याही आयुष्यात नजरकैदेतून निसटून जाण्याचा योगायोग आला. शिवरायांनी मुघल साम्राज्याच्या- फौलादाखानाच्या पोलादी पंजातून निसटून त्यांच्याच प्रदेशातून शेकडो मैलांचा प्रवास करत त्यांच्या हातावर तुरे दिल्या. तर सुभाषबाबूंनी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटून पुढे जर्मनी-जपानमध्ये इतिहासाचा एक अध्याय घडवला. दोघांचीही निसटून जाण्याची पद्धतही जवळपास विस्मयकारकरीत्या सारखी. आजारी असल्याची, संन्यस्त राहण्याचे नाटक करायचे, पहाऱ्यावर
असलेल्या रक्षकांना एखाद्या गोष्टीची सवय लावायची (शिवारायांनी दानाधर्माच्या पेटाऱ्यांची आणि सुभाषबाबूंनी शिशिरच्या कार चालवण्याची) आणि एखाद्या दिवशी हळूच त्यांना गाफील ठेवून जिवावर उदार होऊन पोबारा करायचा. शत्रूची बलस्थाने आणि कमकुवत बाजू हेरून त्याप्रमाणे नियोजन करण्याचे कौशल्य दोघांचेही वादातीत. “शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र” असे म्हणत स्वराज्यासाठी शत्रूचीही प्रायोरिटी ठरवून ध्येयाकडे वाटचाल करणे हीदेखील दोन्ही महापुरुषांचे समान गुण. त्यासाठी शिवरायांनी कधी दिल्लीच्या तख्ताला हाताशी धरून शहाजीराजांची सुटका केली तर कधी टोपीकर आणि पोर्तुगीजांशी सबुरीने घेतले. सुभाषबाबूंनी जर्मन-जपानशी हातमिळवणी करून ब्रिटिश साम्राज्याला हादरे दिले.
या सगळ्याच पराक्रमी महापुरुषांना अकाली अंताचा शाप मिळाला असला तरीही त्यांनी उपलब्ध साधनांचा खुबीने वापर करून ज्या पद्धतीने प्रस्थापित शक्तींविरुद्ध लढा छेडला त्यासाठी वाघाचंच काळीज लागतं. हे सर्व करताना त्यांना अनेकदा स्वकीयांचेही अडथळे आले. शिवराय आणि शंभू महाराजांना अंतर्गत फंदफितुरीमुळे, नेताजींना तथाकथित अहिंसेच्या पुजारी म्हणवणाऱ्या लोकांमुळे कधी कच खावी लागली. पण ते कधीही आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या अढळ निश्चयापासून डगमगले नाहीत.
जाता जाता: एक विषद सत्य म्हणजे शिवराय आणि सुभाषबाबू या दोन्ही महापुरुषांचे मृत्यू हे एक विस्मयकारक गूढ बनून राहिले आहेत.




Mast Lihilas re… Mahanayak flipkart madhun magavato aahe.. Sangrahich Thevava asa ha vasaa aahe…
छत्रपती शिवाजी महाराज हे सुभाषचंद्रांचे आद्यदैवत होते. लेख छान आहे.
Chhan Comparison kelis… Kharyaa arthane ek "Shriman Yogi" ani Dusra "Mahanayak"..
Bhartachya itihasat hyaa doghana ek Adhal Sthan aahe..
आवडले बुवा
मस्त पोस्ट झाली आहे….
>>एक विषद सत्य म्हणजे शिवराय आणि सुभाषबाबू या दोन्ही महापुरुषांचे मृत्यू हे एक विस्मयकारक गूढ बनून राहिले आहेत.
अगदी सहमत.
Sundar tulana jhaliye. Khupach aavdale.
या वेळी एक विशेष अभ्यासपूर्वक वाचन करून नंतर एक पोस्ट लिहिण्याचा विचार आहे.
वाट पाहतोय
Manala sparshun gela ha lekh..